नवी दिल्ली : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी आपल्या पदाची शपथ घेतली. लाल कुर्ता घालून राधाकृष्णन यांनी इंग्रजीत शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
देशाचे नवे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी त्यांच्या आधी उपराष्ट्रपती असलेले जगदीप धनखड देखील उपस्थित होते. २२ जुलै रोजी अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांचे पद रिक्त झाले आणि त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी निवडणुका झाल्या. राजीनाम्यानंतर जगदीप धनखड सार्वजनिक ठिकाणी दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांच्याशिवाय माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि हमीद अन्सारी यांनीही शपथविधीला हजेरी लावली. राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठेही दिसले नसल्याने विरोधी पक्षाकडून सातत्याने ते कुठे आहेत आणि कसे आहेत याबद्दल प्रश्न विचारले जात होते.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. धनखड हे शपथविधी समारंभात पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या शेजारी व्यंकय्या नायडू आणि हमीद अन्सारी बसलेले दिसले. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, हरियाणाचे नायब सिंह सैनी आणि उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री देखील या समारंभात सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta