
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळील कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या कारला देखील आग लागली. स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.
दिल्लीतील लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळील गेट नंबर १ वर सायंकाळी ६. ४५ वाजता हा स्फोट झाला. स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. वर्दळीच्या ठिकाणी हा स्फोट झालाय. पोलिसांनी या स्फोटामागचं कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळ कारचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. स्फोटानंतर ३ ते ४ वाहनांना आग लागली. या स्फोटात प्रचंड नुकसान झालं आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर २४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
स्फोटाविषयी प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या घरांना देखील हादरा बसला आहे. स्फोट झाल्यानंतर क्षणार्धात आजूबाजूच्या काही वाहने जळून खाक झाल्या.
प्रत्यक्षदर्शी राजधर पांडे यांनी सांगितलं की, आम्ही घरातून कारला आग लागल्याचं पाहिलं. त्यानंतर आम्ही नेमकं काय झालं, हे पाहण्यासाठी पोहोचले. त्यानंतर स्फोट झाल्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळापासून जवळच राहतो’.
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट
दिल्लीमध्ये स्फोटाची घटना घडल्यानंतर मुंबई पोलिसांनी सावधगिरीची उपाययोजना अधिक कडक केल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीनंतर मुंबई शहरातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta