Sunday , July 26 2026
Breaking News

बॉक्साईड रोडला कचऱ्याचा ढीग; भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर

Spread the love

 

बेळगाव : बॉक्साईड रोड परिसरात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग साचल्यामुळे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. कुमारस्वामी लेआऊट ते हिंडलगा रोड पर्यंतच्या रस्त्याला जणू कचरा डम्पिंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिसरातील लोक आपल्या घरातील सुका आणि ओला कचरा महानगरपालिकेच्या कचरा उचल घंटागाडीकडे देणे ऐवजी रस्त्याच्या कडेला आणून टाकत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे या भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्याशेजारी टाकलेल्या कचऱ्यामध्ये अन्नाच्या शोधार्थ भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असतो. या रस्त्यावरून जाताना दुचाकी वाहनांसमोर अचानक कुत्री आडवी आली तर एखादा अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महानगरपालिकेकडून देखील वेळेत कचरा उचल होत नसल्यामुळे या भागात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. घरगुती कचऱ्यांबरोबरच परिसरातील घरांच्या जुन्या इमारतींचे अवशेष दगड, विटा, माती देखील या ठिकाणी टाकलेली पहावयास मिळत आहेत. रस्त्याकडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यांमध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. हे प्लास्टिक वाऱ्याने सर्वत्र उडून जिकडेतिकडे पडलेले दिसते. प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला झाडेझुडपे देखील वाढली आहेत. दोन वर्षांपूर्वी बॉक्साईड रोडचे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे मात्र रस्त्याच्या कडेला मातीचे ढिगारे अजूनही हटवण्यात आलेले नाहीत. त्याचप्रमाणे या रस्त्यावर पथदीप देखील बसवण्यात आले नसल्यामुळे संध्याकाळी या रस्त्यावर पूर्णपणे अंधार पसरलेला असतो. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवीत असताना रस्त्याचा नेमका अंदाज येत नाही त्यामुळे एखादा लहान मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *