Sunday , December 7 2025
Breaking News

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये स्फोट ९ जणांचा मृत्यू

Spread the love

 

जम्मू : दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाची घटना ताजी असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये देखील स्फोटाची भयंकर घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री दक्षिण श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोटाची ही घटना घडली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. पोलिस ठाण्यामध्ये उपस्थित असलेल्या २ पोलिस अधिकाऱ्यांसह ९ जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाला. तर ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नौगाम पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला आणि त्याचे पडसाद अनेक किलोमीटरपर्यंत उमटले. स्फोटामुळे आसपासच्या परिसरातील नागरिक घाबरले. स्फोटानंतर पोलिस स्टेशनच्या इमारतीचा मोठा भाग कोसळला तसंच अनेक वाहनांनी पेट घेतला. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये मृतांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री ११:२२ वाजता झालेल्या या स्फोटात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आणि ३० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या भंयकर स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोट इतका भयंकर होता की आगीचे आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले. स्फोटानंतर पोलिस स्टेशनच्या आतमध्ये छोटे छोटे स्फोट होत होते त्यामुळे बचाव पथकाला आतमध्ये जाण्यासाठी एक तास लागला. या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *