टोकियो : क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत, यादरम्यान त्यांनी जपानमधील भारतीय नागरिकांना संबोधित केले. भारत आणि जपान दोन देशांतील संबंधावर बोलताना भारताच्या विकास प्रवासात जपानची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले आहे. मोदी म्हणाले की, मी जेव्हा-जेव्हा जपानमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रेमाचा वर्षाव होत असल्याचे मला दिसते. तुमच्यापैकी बरेच मित्र अनेक वर्षांपासून इथे स्थायिक झाले आहेत. जपानची भाषा, वेशभूषा, संस्कृती आणि खाद्यपदार्थ एक प्रकारे तुमच्या जीवनाचा भाग बनले आहेत.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपण कर्मभूमीशी शरीर आणि मनाने जोडले जाणे हे आपले वैशिष्ट्य आहे. पण मातृभूमीच्या मुळाशी असलेले नाते ते त्यापासून कधीच अंतर करू देत नाहीत. ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, विवेकानंद त्यांच्या ऐतिहासिक भाषणासाठी शिकागोला जाण्यापूर्वी जपानला आले होते. जपानमध्ये त्यांनी मनावर खोलवर छाप सोडली. त्यांनी जपानमधील लोकांच्या देशभक्तीची, जपानमधील लोकांचा आत्मविश्वास, जपानमधील लोकांची स्वच्छतेसाठी असलेली जागरुकता या सर्वांची खुलेपणाने प्रशंसा केली होती.
भारत आणि जपान हे नैसर्गिक भागीदार आहेत
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि जपान हे नैसर्गिक भागीदार आहेत. भारताच्या विकासाच्या प्रवासात जपानने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जपानशी आमचे नाते जिव्हाळ्याचे, अध्यात्माचे, सहकार्याचे, आपुलकीचे आहे. जपानसोबतचे आमचे नाते हे जगासाठी सामर्थ्य, आदर आणि समान संकल्पाचे आहे. जपानशी आमचे नाते बुद्धाचे, ज्ञानाचे, ध्यानाचे आहे. भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची आजच्या जगाला खूप गरज आहे. आज जगासमोरील सर्व आव्हाने, मग ती हिंसा, अराजकता, दहशतवाद, हवामान बदल यापासून मानवतेला वाचवण्याचा हा मार्ग आहे. भारताचे भाग्य आहे की, त्याला भगवान बुद्धांचा प्रत्यक्ष आशीर्वाद लाभला आहे. त्यांच्या विचारांना आत्मसात करून भारत अविरत मानवतेची सेवा करत आहे. कितीही आव्हाने असोत, कितीही मोठी असो, भारत नेहमीच त्यावर उपाय शोधतो.
पंतप्रधान म्हणाले, जेव्हा लस उपलब्ध झाली, तेव्हा भारतानेही ‘मेड इन इंडिया’ लस आपल्या करोडो नागरिकांना दिली आणि जगातील 100 हून अधिक देशांमध्ये पाठवली. जगासमोर 100 कोरोना पासून वर्षातील सर्वात मोठे संकट उभे राहिले. जेव्हा ते सुरु झाले तेव्हा पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नव्हते. त्याची लस येईल की नाही हे देखील कोणाला माहीत नव्हते. पण भारताने त्यावेळी जगातील देशांना औषधे देखील दिली. डब्ल्यूएचओने भारताच्या आशा भगिनींना महासंचालक- ग्लोबल हेल्थ लीडर्स पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारतातील लाखो आशा भगिनी, मातृत्वापासून लसीकरणापर्यंत, पोषणापासून स्वच्छतेपर्यंत, देशाच्या आरोग्य मोहिमेला चालना देत आहेत, असे मोदी म्हणाले.
जपानच्या लोकांनी ज्या प्रकारे नैसर्गिक आपत्तींच्या आव्हानांना तोंड दिले आहे, प्रत्येक समस्येतून काहीतरी शिकले आहे, उपाय शोधले आहेत, यंत्रणाही विकसित केली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हे कौतुकास्पद असल्याचे सांगून. मोदी पुढे म्हणाले की, आज भारतही ग्रीन फ्युचर, ग्रीन जॉबसाठी वेगाने वाटचाल करत आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर दिला जातो. जैवइंधनाशी संबंधित संशोधन आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे ते म्हणाले.
आज जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत कशा प्रकारे मदत करत आहे, याचे पर्यावरण हे आणखी एक उदाहरण असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. हवामान संकट हे जगासमोरील एक मोठे संकट बनले आहे. भारतात आपण हे आव्हान पाहिले आहे आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने आपण प्रगतीही केली आहे. आम्ही 2070 पर्यंत नेट झीरो करण्यासाठी वचनबद्ध आहोत. इंटरनॅशनल सोलर अलायन्स सारख्या जागतिक संस्थेचेही आम्ही नेतृत्व करत आहोत, असे मोदी यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta