नवी दिल्ली : सध्या देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी अर्ज दाखल करताना पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे बडे नेते उपस्थित होते. दरम्यान, याआधी मुर्मू यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. भारताच्या सर्वोच्चपदी आदिवासी समाजातून आलेल्या व त्याही महिला नेत्या विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जातील पहिले प्रस्तावक ठरले आहेत. भारतातील आदिवासी समाजातील पहिल्या आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकन पत्रावर स्वाक्षरी करण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य असं म्हणत त्यांनी ट्वीट केलं आहे. मुर्मू यांच्या नामनिर्देशन पत्रावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी स्वाक्षरी करण्यात आली आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते स्वत: उपस्थित राहणार नाहीत. तर त्यांच्या जागी पक्षाचे राज्यसभा खासदार विजय साई रेड्डी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते मिधुन रेड्डी हे उपस्थित राहणार आहेत.