श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैपर्यंत नामांकन करता येईल. तसेच २० जुलै रोजी या पदासाठी मतदान होणार आहे, असे श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांनी सभापती महिंदा यापा अभयवर्धने यांच्या हवाल्याने सांगितले आहे.
राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी कब्जा केला आहे. यानंतर राष्ट्रपतींनी १३ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती बिकट झाली आहे. रस्त्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत सर्वत्र आंदोलक दिसत आहेत.
पेट्रोल, वीज, अन्न यासारख्या मूलभूत सुविधांसाठी लोकांचा संघर्ष सुरू आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. याचा फटका नेत्यांना सहन करावा लागत आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनावर ९ जुलै रोजी आंदोलकांनी हल्ला केला होता. आता श्रीलंकेत सर्वत्र लष्कर तैनात करण्यात आले आहे.
गोटाबाया राजपक्षे यांच्यावर मार्च महिन्यापासून राजीनामा देण्यासाठी दबाव आहे. एप्रिलमध्ये विरोधकांनी त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कब्जा केल्यापासून ते अध्यक्षीय निवासस्थान हे निवासस्थान व कार्यालय म्हणून वापरत होते. आंदोलकांचा विरोध पाहता राष्ट्रपती राजपक्षे यांनी शुक्रवारीच घर रिकामे केले होते.
Belgaum Varta Belgaum Varta