नवी दिल्ली : वाढती महागाई, खाद्यान्नावरील जीएसटीसह इतर मुद्यांवरुन विरोधी पक्षांनी संसदेच्या उभय सदनात मंगळवारी प्रचंड गदारोळ घातला. नियमावलीनुसार संसदेत फलक दाखविले जाऊ शकत नाहीत, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांना वारंवार बजावले. मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विरोधी सदस्यांनी फलकबाजी व घोषणाबाजी चालूच ठेवल्याने अध्यक्षांनी कामकाज प्रथम दुपारी दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब कले.
अत्यावश्यक वस्तुंच्या दरात झालेली वाढ तसेच खाद्यान्नावर लागू करण्यात आलेली जीएसटी या दोन मुद्यावर तात्काळ चर्चा घेण्याची मागणी काँग्रेसने लोकसभेच्या कामकाजास सुरुवात झाल्या झाल्या केली. मात्र अध्यक्ष बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास चालू ठेवला. यानंतर आक्रमक झालेल्या विरोधकांनी राडेबाजीला सुरुवात केली. अध्यक्षांच्या समोर येऊन फलक दाखवित घोषणाबाजी करण्यात आल्याने कामकाजात व्यत्यय निर्माण झाला. ‘संसदेच्या बाहेर तुम्ही महागाई कमी करण्याची मागणी सरकारकडे करता, आता संसदेच्या आत लोकहिताच्या प्रश्नावर गदारोळ घालता’ असा टोला बिर्ला यांनी विरोधकांना उद्देशून मारला.
काँग्रेसची संसद आवारात निदर्शने
वाढत्या महागाईसह इतर मुद्यांवरुन संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे आम आदमी पक्षाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सिंगापूरला जाण्यासाठी केंद्र सरकार परवानगी देत नसल्याचे सांगत निदर्शने केली.
Belgaum Varta Belgaum Varta