नवी दिल्ली : शिवसेनेच्या १२ खासदारांच्या स्वतंत्र गटाचे गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे यांची निवड केली आहे. याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१९) पत्रकार परिषदेत दिली. तसेच भाजप शिवसेना युती होण्याबाबत जून महिन्यात चर्चा सुरू झाली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेही युतीसाठी तयार होते, चार वेळा चर्चाही झाली होती. परंतु शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीमध्ये खोडा घातला, असा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी केला.
शेवाळे म्हणाले की, युतीसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो होतो. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये १ तास चर्चाही झाली होती. यानंतर युतीबाबत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला खासदार अरविंद सावंत आणि संजय राऊतही उपस्थित होते. यावेळी मलाही युती करायची आहे, असे ठाकरे म्हणाले. तसेच तुम्हीही युतीसाठी प्रयत्न करा, असे ठाकरे यांनी सांगितले. परंतु संजय राऊत यांची विधाने युतीमध्ये खोडा घालणारी ठरली. आणि ठाकरे यांनीही युती करण्याबाबत फारसा प्रतिसाद दिला नाही, असेही शेवाळे यांनी सांगितले.