नवी दिल्ली : केंद्र सरकारने काही खाद्यवस्तूवर वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेतून हटवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ट्विट करीत यासंबंधी माहिती दिली. या खाद्य वस्तुंच्या खुल्या विक्रीवर कुठलेही जीएसटी शुल्क आकारले जाणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. डाळ, गहू, मोहरी, मका, तांदूळ, पीट, रवा, बेसन, लस्सी सारख्या खाद्यवस्तूचा त्यात समावेश आहे. यासंबंधीची यादी सीतारामण यांनी प्रसिध्द केली आहे.
या खाद्यवस्तुंची लेबल तसेच पॅकेजिंग करीत विक्री करण्यात आली तर त्यावर ५% जीएसटी आकारला जाईल. जीएसटी परिषदेने प्रक्रियेनूसार हा निर्णय घेतल्याचे सीतारामण म्हणाल्या. कर गळती रोखण्यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक होता. अधिकारी तसेच मंत्र्यांनी सामुहिक स्वरुपात विविध पातळीवर या निर्णयाचा विचार केल्यानंतर सर्व सदस्यांच्या पुर्ण सहमतीने जीएसटी परिषदेने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याचे सीतारामण म्हणाल्या.
हा निर्णय जीएसटी परिषदेच्या ‘ग्रुप ऑफ मिनिस्टर्स’ ने घेतला आहे.पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश,गोवा तसेच बिहारच्या सदस्यांचा त्यात समावेश होता तर कर्नाटकचे मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष होते. गेल्या काही दिवसांपूर्वी जीएसटी परिषदेची ४७ व्या बैठकीत डाळ, अन्नधान्य तसेच पीठावर विशेष परिस्थितीत जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंरतु, या निर्णयानंतर विविध मुद्द्यांवर संभ्रम पसरवण्यात आला होता.हा संभ्रम दूर करण्यासाठी यादी शेअर करण्यात आल्याचे ट्विट सीतारामण यांनी केले.