नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट 5.4 टक्के इतका झाला आहे. शुक्रवारी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची किंवा जीडीपीची वाढ 7.2 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ 16.2 टक्के, दुसर्या तिमाहीत 6.2 टक्के, तिसर्या तिमाहीत 4.1 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 4 ते 4.1 टक्के अशी असेल. पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये प्रत्यक्ष जीडीपी वाढ 6.7 टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था महागाईशी झुंज देत असून गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातून 13.3 अब्ज डॉलर्स इतके भांडवल बाहेर गेले असल्याचेही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. परंतु, भारतीय अर्थव्यवस्थेत पुरेसे भांडवल खेळते असून जागतिक अर्थव्यवस्थेतील धक्क्यांना पचवू शकेल एवढे परकीय चलनही भारताकडे असल्याचे दास म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta