पाटणा : बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. आज नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. याच मंत्रिमंडळ बैठकीत 24 ऑगस्टला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारच्या नव्या सरकारमध्ये 24 आणि 25 ऑगस्टला बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून 24 ऑगस्टला नितीश आणि तेजस्वी हे विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.
बिहारमधील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आता बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यात आरजेडी, जेडीयू, काँग्रेस, हम आणि डावे पक्ष आहेत.
शपथविधी आजच
याआधी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरच मोठी घोषणा केली आहे. येत्या एक महिन्यात राज्यातील गरीब आणि तरुणांना बंपर रोजगार दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले. तेजस्वी यादव म्हणाले की, हा रोजगार मेळावा इतका भव्य असेल, जो आतापर्यंत इतर कोणत्याही राज्यात झाला नाही. तत्पूर्वी, तेजस्वी म्हणाले की, बिहारने देशाला जे हवे होते ते केले आहे. आम्ही त्यांना मार्ग दाखवला आहे. आमचा लढा बेरोजगारीविरोधात आहे, असं ते म्हणाले.
बिहारमधील राजकीय परिस्थितीवर जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन (लालन) सिंह म्हणाले की, नितीश कुमार यांना 2020 मध्ये मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. परंतु तुम्ही (भाजप) त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री बनवले. आरसीपी सिंह हे भाजपचे एजंट म्हणून जेडीयूमध्ये आले. तुम्ही (भाजप) युती धर्म पाळला नाही, आम्ही आयकर, सीबीआय आणि ईडीला घाबरत नाही.
Belgaum Varta Belgaum Varta