कोलकात्ता : प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी न्यायालयात टीएमसीचे बीरभूम जिल्हाध्यक्ष अनुब्रत मंडल यांना 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे. सीबीआयने अनुब्रत मंडल यांना आज आसनसोल येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले. सीबीआयने 14 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने 10 दिवसांची कोठडी दिली आहे. टीएमसी नेत्याला प्राण्यांच्या तस्करीच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.
अनुब्रत मंडल यांना न्यायालयात हजर करताना लोकांमध्ये संताप दिसून आला. न्यायालयाजवळ जोडे दाखवत लोकांनी ’चोर, चोर’च्या घोषणा दिल्या. आज सकाळी सीबीआयची एक टीम अनुब्रत मंडल यांच्या घरी पोहोचली. तासाभराच्या चौकशीनंतर सीबीआयने मंडल यांना अटक केली. केंद्रीय दलाच्या कर्मचार्यांसह किमान आठ अधिकार्यांचे सीबीआय पथक सकाळी 10 च्या सुमारास मंडल यांच्या निवासस्थानी पोहोचले. यानंतर या पथकाने त्यांच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली.
तत्पूर्वी तृणमूल नेते अनुब्रत मंडल हे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत दोनदा केंद्रीय तपास यंत्रणेसमोर हजर झाले नव्हते. अनुब्रत मंडल यांना अटक केल्यानंतर सीबीआय अधिकार्याने सांगितले की, प्राणी तस्करी घोटाळ्याच्या तपासात असहकार केल्याबद्दल आम्ही त्यांना अटक केली आहे. या घोटाळ्यात मंडल यांचा थेट सहभाग आढळून आला आहे. आम्ही त्याची चौकशी करून कायद्यानुसार आवश्यक कारवाई करू.
तृणमूल नेत्याच्या निकटवर्तीयांवरही छापे टाकण्यात आले
सीबीआय अधिकारी म्हणाले की, अनुब्रत मंडल यांना अटक करण्यापूर्वी सीबीआयने नोटीस बजावली होती. त्याचा अंगरक्षक सहगल हुसैन यालाही केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. तपास यंत्रणेच्या अधिकार्यांनी तृणमूल नेत्याच्या अनेक निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवरही छापे टाकले आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले. मंडल यांची सीबीआयने यापूर्वी दोनदा चौकशी केली आहे.