पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत असणारी युती तोडत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नितीश कुमार यांनी जदयू आणि राजदसह काँग्रेस, डावे पक्ष आणि जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर नवं सरकार स्थापन केलं. नितीश कुमारांनी युती तोडून राजदसोबत आघाडी करणं भाजपच्या जिव्हारी लागलं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वासह राज्य पातळीवरील नेत्यांनी नितीश कुमारांवर हल्लाबोल सुरु केला आहे. भाजपकडून पोल खोल नितीश कुमार हे अभियान लवकरच सुरु करण्यात येणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत, त्यापैकी ३५ जागा जिंकण्याचा निर्धार भाजपनं केला आहे. भाजपकडून हा डाव यशस्वी होण्यासाठी रामविलास पासवान यांच्या पक्षाचे जे दोन गट पडले आहेत, त्यांचं एकत्रीकरण केले जाण्याची शक्यता आहे.
पोल खोल नितीश कुमार अभियान राबवणार
भाजप नितीश कुमार यांना घेरण्यासाठी बिहारमध्ये पोल खोल नितीश कुमार अभियान सुरु करण्यात येणार आहे. या अभियानामार्फत बिहारमध्ये विविध ठिकाणी सभांचं आयोजन केलं जाणार आहे.
बिहारमध्ये भाजपचं मिशन ३५
भाजपनं बिहारमध्ये लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं तयारीला सुरुवात केली आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. सध्या बिहारमध्ये भाजपचे १७ खासदार आहेत. जदयूकडे १६ खासदार, काँग्रेसचा एक, लोकजनशक्ती पार्टी रामविलास पार्टीचा १ आणि लोकजनशक्ती पार्टी पारस गटाचे ५ खासदार आहेत. राजदला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. भाजपनं नितीश कुमार यांच्या नव्या प्रयोगाला शह देण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मिशन ३५ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta