वायनाड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाड येथील कार्यालयाची जूनमध्ये तोडफोड करण्यात आली होती. एसएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी तोडफोड करून गोंधळ घातल्याचे सांगण्यात आलं होतं. संबंधित घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. मात्र, त्याप्रकरणी आता पोलिसांनी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यामध्ये राहुल गांधींचा एक पीएही असल्याचं बोललं जात आहे.
खरं तर, काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणाबाबत एक मोठा निर्णय दिला होता. त्यानुसार, संरक्षित जंगले किंवा वन्यजीव अभयारण्यांभोवतीचा एक किलोमीटरचा संपूर्ण परिसर हा पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र (ESZ) म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली, तर जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांचे काय होणार? ते कुठे जाणार? असा वाद केरळात सुरू झाला होता. याच कारणातून एसएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी २४ जून रोजी राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचे आरोप करण्यात आले होते.
पण काँग्रेसकडून करण्यात आलेले हे आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तोडफोड एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केली नसून काही काँग्रेस कार्यकर्त्यांनीच केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या पीएचाही समावेश आहे.
जेव्हा राहुल गांधी यांच्या कार्यालयावर हल्ला झाला, तेव्हा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये काही आंदोलक कार्यालयाच्या खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न करत होते. संबंधित आंदोलकांनी कार्यालयात शिरून महात्मा गांधींची फोटो फ्रेमही तोडल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र, तपासानंतर या घटनेला वेगळं वळण लागलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta