अबू रोड : श्री गणेशाचे आगमन होत आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय काळात सदगुणांची आराधना हीच खरी गणेश चतुर्थी असेल, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सुप्रसिद्ध राजयोग वरिष्ठ प्रशिक्षिका आणि अध्यात्मिक वक्त्या बी.के. शिवानी यांनी बोलताना केले.
आज सोमवारी सायंकाळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या अबु रोड येथील शांतीवन मुख्यालयात पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला बी.के. शिवानी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना त्या पुढे म्हणाल्या, गणेशाचे अंग विविध सद्गुणांनी व्यापलेले आहे. विकारांचे प्रतीक असलेल्या उंदरावर गणराज विराजमान झाले आहेत. संयम, नियम आणि मर्यादेने जीवनाला बांधून ठेवण्याचा संदेश, श्री गणेशा कडून प्राप्त होतो. भारताला स्वर्णीम भारत बनवायचे असल्यास प्रत्येकानेच दुःखहर्ता सुखहर्ता भूमिका पार पाडावी लागेल, असेही बीके शिवानी यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात नेपाळहून आलेले वरिष्ठ पत्रकार हरिहर बिहारी, लखनऊचे वरिष्ठ पत्रकार एस. एस. त्रिपाठी, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे माध्यम समन्वयक बी.के. निकुंज तसेच बी.के शांतनू यांनीही आपले समयोचीत विचार मांडले.
या कार्यक्रमात बी.के. आत्मप्रकाश यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्यालय समन्वयक बी.के. शिविका यांनी संस्थेच्या तसेच कोरोना काळात झालेल्या कार्याची माहिती दिली. शिवशक्ती सांस्कृतिक अकॅडमी बेंगळूर तसेच खडकपूर स्टार जलसा संस्थेच्या कलाकारांनी सुंदर नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. के. चंदा यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta