नवी दिल्ली : नेपाळमध्ये बुधवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील डोटी जिल्ह्यात काही घरेदेखील पडली आहेत. ६.३ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचे हादरे राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही बसले आहेत.
नेपाळमधील डोटी जिल्ह्यामध्ये पहाटेच भूकंप झाल्याची घटना घडली. या भूकंपात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नेपाळच्या लष्कराकडून बचावकार्य केले जात आहे. या भूकंपात अनेक घरेदेखील जमीनदोस्त झाली आहेत. या भूकंपाचे धक्के रात्री २ वाजता राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही जाणवले. येथे रात्री २ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले.
या भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली असल्याची माहीती येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपामध्ये मृत्यू झालेल्यांची ओखळ अद्याप पटलेली नाही. मात्र मृतांमध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. दरम्यान मागील २४ तासांमधील नेपाळमधील हा दुसरा भूकंपाचा धक्का आहे. याआधी मंगळवारी सकाळी ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
Belgaum Varta Belgaum Varta