मुंबई : हिंडेनबर्गचा संशोधन अहवाल समोर आल्यानंतर गौतम अदानी समूहाला मोठे नुकसान झाले आहे. अदानी समूहाला आठवडाभरात शंभर अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. शंभर अब्ज डॉलरचे भारतीय मूल्य 8.20 लाख कोटी आहे. अदानी समूहाचे भांडवली बाजार मूल्य घसरले आहे.
अदानी एंटरप्रायझेसने 20 हजार कोटींचा एफपीओ मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आज अदानी समूहातील कंपन्याच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी समुहातील सातही कंपन्यांचे शेअर्स पुन्हा गडगडले आहेत. मात्र अदानी एन्टरप्रायझेजच्या समभागातही सात टक्क्यांची घसरण आली आहे. अदानी टोटल गॅसच्या समभागात मागील पाच दिवसात 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागात होत असलेल्या घसरणीचा गौतम अदानींना देखील फटका बसला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालाआधी श्रीमंतांच्या यादीत तिसर्या स्थानी असलेले गौतम अदानी थेट 15 व्या स्थानी आले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. अदानींची संपत्ती 72.7 अब्ज डॉलर्सवर आली आहे.
अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ आणला होता. हा एफपीओ बुधवारी मागे घेण्यात आला आहे. याबाबत अदानी समूहानं परीपत्रक जारी केले आहे. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचं अदानी समूहानं परिपत्रकात सांगितलं.
Belgaum Varta Belgaum Varta