छत्तीसगड-तेलंगणा राज्यांच्या सीमेवर १० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ट्रॅक्टरमध्ये भरलेली स्फोटके जप्त करण्यात आली असून, या वर्षातील मोठ्या हल्ल्याचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. जेरबंद केलेल्या पाच नक्षली हे विजापूरचे रहिवासी आहेत. तेलंगणाच्या भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी सीमा भागात कारवाई केली आहे.
या कारवाई संदर्भात तेलंगणा पोलिसांनी माहिती दिली आहे की, नक्षलवादी मुलाकानपल्ली हा दुमुगुडेम येथे मोठ्या प्रमाणात स्फोटकांसह लपला असल्याची गौपनीय माहिती मिळाली. भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी दुमुगुडेम पोलिस आणि सीआरपीएफच्या १४१ व्या बटालियनच्या जवानांचा समावेश असलेली एक टीम तयार केली. सुरक्षा दलांच्या जवानांनी परिसरातील गावे आणि जंगलात शोधमोहीम राबवली. या कारवाईत १० संशयितांना पकडण्यात आले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
हा सर्व दारूगोळा नक्षली नेत्यांनी मागवला होता, असे अटक केलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांना सांगितले. त्याचा वापर हल्ल्यासाठी केला जाणार होता. या सर्वांच्या चौकशीत अनेक खुलासेही झाल्याचे भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकाची किंमत लाखोंच्या घरात आहे.
तब्बल ५०० डिटोनेटर्स जप्त
जप्त केलेल्या मालामध्ये एक ट्रॅक्टर, एक मोटार आणि दोन दुचाकींचा समावेश आहे. ट्रॅक्टरमध्ये कार्डेक्स वायरचे सुमारे 90 बंडल, 500 डिटोनेटर आणि इतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेले पाच नक्षली हे तेलंगणातील पामेड भागातील आणि पाच छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सर्व आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून माओवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
चौकशीत झाले महत्त्वपूर्ण खुलासे
तेलंगणा पोलिसांनी जप्त केलेली स्फोटके ही बड्या माओवादी नेत्यांनी मागवली होती, असे अटक केलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांना सांगितले. याचा वापर हल्ल्यासाठी केला जाणार होता. या सर्वांच्या चौकशीत अनेक खुलासेही झाल्याचे भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांची किंमत लाखोंच्या घरात आहे. मात्र, माओवादी ही स्फोटके कुठून आणत होते, याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही.
Belgaum Varta Belgaum Varta