नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना न्यायालयाने कुठलाही दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने १ जून पर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. मंगळवारी त्यांना राऊस एव्हेन्यू विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान सिसोदियांनी अध्ययनासाठी एक खुर्ची तसेच टेबल उपलब्ध करवून देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. त्यांच्या मागणीवर विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने तुरूंगाधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, न्यायालयात हजर करतांना सिसोदियांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांनी गैरवर्तुवणूक केल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच आम आदमी पक्षाने केला आहे. पोलिस कर्मचारी सिसोदियांची मानगुट पकडून घेवून जात असल्याचा एक व्हिडिओ केजरीवालांनी शेअर करीत दोषी कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. सिसोदियांसोबत असा व्यवहार करण्याचा पोलिसांना अधिकार आहे का? पोलिसांना अशी वर्तणूक करण्याचे वरून आदेश आहेत का? असे सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
एका प्रकरणात न्यायालयाने मनिष सिसोदिया आणि इतर तिघांविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या पूरक आरोपपत्रावरील आदेश राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती एम.के.नागपाल यांचे न्यायालय २७ मे रोजी यावरील आदेश सुनावणार असल्याचे कळते.