
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला महिनाअखेरीस नऊ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने भाजप देशव्यापी जनसंपर्क मोहीम राबवली जाणार आहे. राजस्थानमध्ये ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीरसभेतून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. ही मोहीम आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पूर्वतयारी असल्याचे मानले जात आहे.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काही केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी देशव्यापी कार्यक्रमाची रूपरेखा निश्चित करण्यासाठी बैठक घेतली. मोदी सरकारच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवून निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ व तेलंगणा या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून देशव्यापी जनसंपर्काचा राजकीय लाभही मिळेल, यादृष्टीने भाजपने मोहिमेची आखणी केली आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आले असून राज्या-राज्यांतील लोकप्रिय समाजमाध्यम इन्फ्लुएंझर तसेच, नामांकित व्यक्तींशी संपर्क साधण्याचे लक्ष्य देण्यात आले असल्याचे समजते.
भाजपच्या वतीने २५ मे रोजी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक गप्पाही आयोजित केल्या आहेत. यावेळी नड्डा, शहा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील. २७ मे रोजी नड्डा पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या काळातील यशाची माहिती देतील. ३० मे २०१९ मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.
राज्यात नऊ नेत्यांवर जबाबदारी
मुंबई : राज्यात या अभियानासाठी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह नऊ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजना, आर्थिक पाठबळातून उभे राहात असलेले किंवा काम पूर्ण झालेले प्रकल्प आणि सरकारची कामगिरी ही वेगवेगळय़ा माध्यमांतून सर्व समाजघटकांपर्यंत पोचविली जाणार आहे. ही जबाबदारी प्रत्येक मतदारसंघातील भाजप खासदार, ज्या मतदारसंघात भाजपचे खासदार नाहीत, तेथे आमदार किंवा राज्यस्तरीय नेत्यांवर हे काम सोपविण्यात आले आहे. त्यासाठी लाभार्थी मेळावे, वकील, डॉक्टर, पत्रकार, शिक्षक आदी समाजांतील मान्यवरांबरोबर बैठका, सभा, मेळावे, सादरीकरण, पत्रके आणि डिजिटल, ऑनलाइन माध्यमातूनही सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोचविली जाणार आहे.
महिनाभरात ५० सभा
भाजपच्या देशव्यापी संपर्क मोहीम ३० मे ते ३० जून अशी महिनाभर राबवली जाणार असून किमान ५० जाहीरसभा घेतल्या जातील, त्यातील काही सभांमध्ये मोदीही सहभागी होणार आहेत. ३१ मे रोजी राजस्थानमधील अजमेरमध्ये मोदी पहिली जाहीरसभा घेतील. या जाहीरसभांमध्ये पक्षाध्यक्ष नड्डा, केंद्रीयमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह तसेच, अन्य वरिष्ठ मंत्रिगणही सहभागी होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
Belgaum Varta Belgaum Varta