पुणे : पावसाकडे नजर लावून बसलेल्या शेतकऱ्यांसह आनंदाची बातमी आहे. मान्सूनची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. त्यामुळे उकाड्यापासूनही लवकरच दिलासा मिळणार आहे. केरळमध्ये उद्या मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पुढील 24 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती
एकीकडे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ तीव्र होत असतानाच भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी सर्व परिस्थिती अनुकूल आहे. यामुळे 9 जूनपासून केरळमध्ये मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी केरळमध्ये पाऊस दाखल होत असतो. पण यंदा पाऊस लांबला आहे.
पुढील 48 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार
भारतीय हवामान विभागाने बुधवारी सांगितल होतं की, ‘येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.’ भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या केरळमध्ये पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. आयएमडीने सांगितले की, ”बिपरजॉय चक्रीवादळाचं रुपांतर वेगाने तीव्र चक्रीवादळात होत आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.”