नवी दिल्ली : आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी आघाडी तयार करण्याच्या हेतूने शुक्रवार, २३ जून रोजी विरोधी पक्षांची पाटणा येथे बैठक हाेणार आहे. या बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा सूरु असतानाच दिल्लीतील प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अन्यथा शुक्रवारी पाटणा येथे हाेणार्या बैठकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. त्यामुळे विरोधकांची बैठक होण्यापूर्वी मतभेदाची चर्चा सुरु झाली आहे.
केंद्र सरकारने दिल्लीसाठी आणलेल्या अध्यादेशावर सर्वप्रथम चर्चा व्हावी. अध्यादेशाच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने व्यक्त केली होती. या मुद्द्यावर काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसच्या दिल्ली विभागाचे नेते सुरुवातीपासूनच या अध्यादेशाला विरोध करण्यास तयार नाहीत. आपण अध्यादेशाच्या विरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. केजरीवाल यांनी अध्यादेशाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची वेळही मागितली आहे, मात्र त्यांना अद्याप वेळ मिळालेला नसल्याचे समजते.
केजरीवाल यांची भेट काँग्रेस नेत्यांनी टाळली ?
केजरीवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सांगत आहेत की, काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, अन्यथा दिल्लीसारखी स्थिती इतर राज्यांमध्येही होऊ शकते. यासाठी केजरीवाल यांनी विरोधी पक्षांना पत्र लिहून काँग्रेसमधून ‘आप’ला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले होते. आता विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीच्या एक दिवस आधी आम आदमी पक्षाने अध्यादेशाला दिल्लीला पाठिंबा द्यावा अन्यथा बैठकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा आपने काँग्रेसला दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी आघाडी तयार करण्याच्या हेतूने शुक्रवार, २३ जून रोजी विरोधी पक्षांची पाटणा येथे बैठक घेणार आहे. विरोधी आघाडीची रणनीती आणि निवडणुकीला सामोरे जातान ‘किमान समान कार्यक्रम’ कसा असावा, या दोन प्रमुख मुद्यावर या बैठकीत चर्चा होईल, अशी चर्चा आहे.