पटना : देशात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकीकडं काँग्रेसची भारत जोडण्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडं भाजप आणि आरएसएसची भारत तोडण्याची विचारधारा असल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं. भारताला तोडण्याचे काम भाजप करत असल्याचा हल्लाबोल राहुल गांधींनी केला. आज पाटण्यात भाजपविरोधी 23 पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी राहुल गांधी पाटण्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
भाजपकडून भारत तोडण्याचे काम सुरु
काँग्रेस पार्टीचा डीएनए हा बिहारमध्ये आहे. भाजर जोडो यात्रेत बिहारच्या जनतेनं खूप मदत केल्याचे राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रा सुरु असताना प्रत्येक राज्यात बिहारचे लोक आमच्यासोबत होते. काँग्रेसच्या विचारधारेला बिहारचे लोक मानत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. भाजपकडून भारत तोडण्याचे काम सुरु आहे. देशात द्वेष आणि हिंसा पसरवण्याचे काम भाजपकडून सुरु असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस जोडण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.
तेलंगणा, मध्ये प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस विजयी होणार
पाटण्यात आज देशातील सर्व विरोधी पक्षांचे नेते आले आहेत. आम्ही सर्वजण एकत्र येऊन भाजपला हरवणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तेलंगणा, मध्ये प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजप दिसणार नाही. तिथे फक्त काँग्रेस विजयी होईल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. काँग्रेस गरिबांबरोबर उभी आहे. देशातील दोन ते तीन लोकांना फायदा पोहोचवणे हेच भाजपचे काम असल्याचे राहुल गांधी म्हणाले. देशातील संपत्ती त्यांना देण्याचा भाजपचा उद्देश आहे. तर गरीबांचे काम करणं, त्यांच्या बाजूनं उभं राहणं हा काँग्रेसचा उद्देश असल्याचे राहुल गांधी म्हणाले.