नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने ‘यलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन आणि पूराची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू, तर इतर १० जण जखमी झाल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य सचिव ओंकार चंद शर्मा यांनी दिली. येत्या पाच दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
देशातील ८०% भूभागावर मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान उत्तर भारतातील काही राज्यांसह गुजरात, राजस्थान आणि पंजाब मधील काही भागात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. येत्या दोन दिवसांमध्ये या भागात मान्सूनच्या सरी कोसळतील, असे हवामान खात्याने सांगितले आहे. आयएमडीने २० राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आसाम, जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्येही अतिवृष्टीची शक्यता आहे. दिल्ली, केरळसह अनेक राज्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २ जुलैपर्यंत राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणात सौम्य तसेच मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. अंदमान-निकोबार सह पश्चिम बंगाल, सिक्किम, पंजाब, हिमाचल, ओडिशा, हरियाणा, चंदीगड, पूर्व राजस्थान, सौराष्ट तसेच कच्छमधील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हरियाणाला पाच दिवसांचा यलो अलर्ट
हरियाणातील चंदीगड, पंचकूला, अंबाला, यमुनानगर, कुरूक्षेत्र, कैथल, करनाल, सिरसा, फतेहाबाद, सिरसा, जिंद, भिवानी, चरखी दादरी, महेंद्रगड, रेवाडी, झज्जर, गुरूग्राम, नूह, पलवल, फरीदाबाद, रोहतक आणि सोनीपत मध्ये मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पुढील चार दिवस या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
छत्तीसगडला ऑरेंज अलर्ट
छत्तीसगडच्या ६ जिल्हांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भोपाळ, ग्वालियर, छिंदवाडा सह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. नरसिंहपुरला सर्वाधिक पावासाची शक्यता आहे.दरम्यान, उत्तराखंडमधील देहराडून, नेनीताल, पोडी, टिहरी, चंपावत, हरिद्वार, बागेश्वर तसेच पिथोरागड मध्ये पावसासंबंधी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta