श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-३’ मोहिमेचे २५.३० तासांची उलटगणती गुरुवारी सुरू झाली. आज, शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता ‘एलव्हीएम३-एम४’ या प्रक्षेपणयानाच्या मदतीने चंद्रयान झेपावेल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसेच शाळांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.
२०१९साली चंद्रयान-२ मोहिमेमध्ये ‘विक्रम’ या लँडरचे अलगद अवतरण करण्याचा प्रयत्न ‘इस्रो’ने केला होता. या लँडरसोबत चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणारा ‘रोव्हर’ही धाडण्यात आला होता. मात्र लँडर चांद्रपृष्ठावर कोसळल्यामुळे ही मोहीम अंशत: यशस्वी ठरली. आता चंद्रयान-३ मोहिमेत या त्रुटी दूर करण्यात आल्याची माहिती ‘इस्रो’ने दिली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हा लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे. वैज्ञानिकांमध्ये ‘फॅट बॉय’ म्हणून ओळखले जाणारे एलव्हीएम-३ (पूर्वीचे जीएसएलव्ही-एमकेएल-२) हे प्रक्षेपणयान अतिशय जड वस्तूमान अंतराळात घेऊन जाण्यास सक्षम आहे. आतापर्यंत प्रचंड यशस्वी ठरलेल्या या प्रक्षेपणयानाची ‘चंद्रयान-३’ ही चौथी मोहीम आहे.