Monday , December 8 2025
Breaking News

ईदच्या दिवशीच पाकिस्तान हादरला, बॉंबस्फोटात 52 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी

Spread the love

 

कराची : ईदच्या दिवशीच पाकिस्तान हादरला असून बलुचिस्तान प्रांतामध्ये एका बॉम्ब स्फोटामध्ये 52 जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांच्या संख्येत अजूनही वाढ होऊ शकते. या बॉम्ब स्फोटाची माहिती पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिली आहे. ईदचा सण साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर एका सुसाईड बॉम्बरने हल्ला केल्याची माहिती आहे.

पाकिस्तानमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने डॉन या वृत्तपत्राला सांगितलं की, बलुचिस्तानच्या मस्तुंगमधील अल फलाह रोडवर असलेल्या मदिना मशिदीजवळ हा स्फोट झाला. ईद मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीत भाग घेण्यासाठी अनेक लोक तेथे जमले असताना हा प्रकार घडला. डॉन वृत्तपत्राने शहीद नवाब गौस बख्श रायसानी मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सईद मिरवानी यांच्या हवाल्याने या मृत्यूंची पुष्टी केली आहे. सिटी स्टेशन हाऊस ऑफिसर मोहम्मद जावेद लेहरी यांनी सांगितले की, स्फोटात एका पोलिस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की हा स्फोट आत्मघाती स्फोट होता. डीएसपी गिसकौरी यांच्या कारजवळ स्फोट झाला.

बलुचिस्तानचे माहिती आणि जनसंपर्क मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, एक बचाव पथक मस्तुंगला पाठवण्यात आले आहे. गंभीर जखमींना क्वेट्टा येथे नेण्यात येत असून सर्व परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आमच्या शत्रूंना परकीय मदतीने बलुचिस्तानमधील धार्मिक सहिष्णुता आणि शांतता नष्ट करायची आहे. अशा प्रकारच्या स्फोटांच्या मागे जे कोणी आहेत त्यांना सोडणार नाही.

पाकिस्तानचे गृहमंत्री सर्फराज अहमद बुगती यांनी या स्फोटात प्राण गमावलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि स्फोटाचा निषेध केला आहे. बुगती म्हणाले की, दहशतवाद्यांचा कोणताही धर्म किंवा श्रद्धा नसून बचाव मोहिमेदरम्यान सर्व संसाधनांचा वापर केला जात आहे. जखमींवर उपचार करण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही आणि दहशतवादी घटक कोणत्याही सवलतीस पात्र नाहीत, असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *