नवी दिल्ली : लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांना धुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून आज (१४ डिसेंबर) लोकसभेत खासदारांनी गोंधळ घातला. त्याच पार्श्वभूमीवर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या ५ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. काँग्रेस खासदार टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रल्हाद जोशींनी मांडला. यावेळी लोकसभाध्यक्षांच्या खुर्चीवर असलेल्या बीजेडीचे भर्तृहरी महताब यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
प्रल्हाद जोशी म्हणाले, “संसदेत झालेल्या घुसखोरीप्रकरणी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी गृह सचिवांना पत्र लिहिले असून चौकशी सुरू झाली आहे. याआधीही गॅलरीतून कागदपत्रे फेकण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील खासदारांनी राजकारण करू नये.”