हरदा : मध्य प्रदेशातील हरदामध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक जण होरपळल्याची प्राथमिक माहिती आहे. फटाक्यांच्या कारखान्यात एका मागोमाग एक अनेक स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या आहेत. धुराचा लोळ आजूबाजूच्या परिसरात पसरला आहे. कारखान्यात आणखी काही कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हरदामध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. एक-दोन नाही तर, कारखान्यामध्ये सतत स्फोट होत आहेत, त्यामुळे उंचच उंच आगीचे लोट उठत आहेत. या कारखान्यात काम करणारे अनेक कामगार कारखान्यात अडकलेले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या आगीत आतापर्यंत 25 होरपळले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
25 हून अधिक जण होरपळले
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत सांगितलं आहे की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून हरदा येथील आगीच्या घटनेसंदर्भात माहिती घेतली आहे.