मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात मोठं अग्नितांडव घडलं आहे. महाकाल मंदिरातील भस्मा आरतीदरम्यान मंदिरातील गाभाऱ्यातच भीषण आग लागली. आगीत पुजारी होरपळून गंभीररित्या जखमी झाले आहेत. होळीमध्ये गुलाल टाकल्यानं आग भडकली आणि संपूर्ण गर्भगृहात पसरली. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सोमवारी सकाळी महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात लागलेल्या आगीत पुजाऱ्यांसह तेरा जण होरपळून निघाले. भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता. त्याचवेळी आग लागली. सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, गर्भगृहातील आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, या घटनेनं तिथे उपस्थित लोकांमध्ये गोंधळ उडाला. या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितलं की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आगीच्या घटनेमुळे पुजाऱ्यांसह काहीजणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
जखमींवर रुग्णालयात उपाचर सुरू
जगप्रसिद्ध महाकालेश्वरच्या प्रांगणात रविवारी संध्याकाळी होळी उत्सवाला सुरुवात झाली होती. इथे सर्वात आधी संध्याकाळच्या आरतीवेळी हजारो भाविकांनी बाबा महाकाल यांच्यासोबत गुलालाची होळी केली. त्यानंतर महाकाल प्रांगणात होलिका दहन करण्यात आलं. उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी सांगितलं की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोणीही गंभीर नाही. सर्व स्थिर आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची चौकशी समिती करणार आहे.