नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात एकूण ६१.४५ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यात आसामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आसामामध्ये सर्वाधिक ७५.२६ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच ५४.७७ टक्के मतदानाची नोंद झाली. तसेच बिहारमध्ये ५६.५५ टक्के, छत्तीसगडमध्ये ६६.९९ टक्के, दादरा नगरहवेलीमध्ये ६५.२३ टक्के आणि गोव्यात ७४.२७ टक्के मतदान झाले.
याशिवाय गुजरातमध्ये ५६.७६ टक्के, कर्नाटकमध्ये ६७.७६ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ६३.०९ टक्के, उत्तर प्रदेशात ५७.३४ टक्के, तसेच पश्चिम बंगालमध्ये ७३.९३ टक्के मतदान झाल्याचं बघायला मिळालं.
दरम्यान, मंगळवारी सकाळी ७ वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली होती. तिसऱ्या टप्प्यात एकूण ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ९२ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. उन्हाचा पारा बघता अनेक ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी ६ पर्यंत वाढवण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. यावेळी त्रिपुरात सर्वाधिक ७७.५३ टक्के, तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी म्हणजेच ५२.७४ टक्के मतदानाची नोंद झाली होती.