नवी दिल्ली : पुढील ३ दिवस कर्नाटकसह विविध राज्यांमध्ये विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार चांगल्या मान्सूनची चिन्हे दिसू लागली आहेत. तसे बदल प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात दिसू लागले आहेत.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १३ मे ला कर्नाटकसह महाराष्ट्र, उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात विजांचा कडकडाट होऊ शकतो. तर हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तर केरळ, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१४ मे रोजी छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटकमध्ये वादळाची शक्यता
१४ मे ला कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि छत्तीसगडमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी वारे ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहू शकतात. याच दिवशी महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये विजांचा कडकडाटही असण्याची शक्यता आहे. उष्णतेचा परिणाम गुजरातमध्ये दिसून येणार आहे. तर १५ मेला ईशान्येकडील राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशासह ईशान्येकडील सातही राज्यांमध्ये पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड,, गुजरात, तेलंगणा आणि गोव्यातही धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पाँडीचेरी, केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.