नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथे (शनिवार) रात्री बेबी केअर सेंटरला लागलेल्या भीषण आगीत 6 मुलांचा होरपळून मृत्यू झाला. रात्री उशिरा 12 मुलांची सुटका करण्यात आली, त्यापैकी 6 मुलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात सध्या 6 मुले दाखल आहेत, एका मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
दिल्ली अग्निशमन दलाने सांगितले की, रात्री 11.32 वाजता आयआयटी, ब्लॉक बी, विवेक विहार परिसरातील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीतून 12 नवजात बालकांना बाहेर काढण्यात आले. गुजरातच्या राजकोट शहरातील गजबजलेल्या गेमिंग झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागल्याच्या आणि एक इमारत कोसळल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे, ज्यात कमीतकमी 27 लोक ठार झाले हाेते, त्यापैकी बहुतेक मुले आहेत.
इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून 12 मुलांची सुटका
दिल्ली अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, बेबी केअर सेंटर 120 यार्डच्या इमारतीत बांधण्यात आले होते. पहिल्या मजल्यावरून 12 मुलांची सुटका करण्यात आली, त्यापैकी 6 मुलांचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि ६ अजूनही रूग्णालयात दाखल आहेत. आज सकाळी अतिदक्षता विभागात असलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
केंद्राच्या आत ऑक्सिजनचे सिलिंडर पडलेले होते
बेबी केअर सेंटरच्या शेजारी एक इमारत होती, तीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. मात्र सुदैवाने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेबी केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर पडून आहेत.