सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद दगडी स्मारकाच्या ध्यानमंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४५ तासांचे ध्यान केलं. १८९२ मध्ये स्वामी विवेकानंदांनी जिथे ध्यान केले त्याच ठिकाणी पंतप्रधान मोदी हे ध्यान करत होते. प्रसिद्ध विवेकानंद दगडी स्मारकाच्या ‘ध्यान मंडपम’ येथे भगव्या रंगाच्या पोशाखात ध्यान करताना पंतप्रधान मोदींचे फोटोही प्रसिद्ध करण्यात आलेत. यावरुनच आता विरोधकांनी पंतप्रधान मोदींना घेरलं आहे. कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. तर हे जगावेगळं ध्यान असल्याची टीका शरद पवार गटाने केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये ध्यानात मग्न होते. गुरुवारी संध्याकाळी ६.४५ वाजता पंतप्रधान मोदी ध्यानाच्या मुद्रेत बसले. या काळात पंतप्रधान मोदी कोणाशीही बोलले नाहीत. त्यानंतर शनिवारी दीड वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांनी त्यांचे ध्यान संपवले. यावेळी पीएम मोदींनी भगवे कपडे परिधान केले होते आणि त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हातात जप माला घेऊन त्यांनी मंडपाची प्रदक्षिणाही केली.
मात्र आता पंतप्रधान मोदींच्या ध्यान धारणेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी. ते आता कुठेतरी दूर गेल्याचे ऐकले आहे. निकाल येण्यापूर्वीच तपश्चर्यासाठी निघून गेले. त्यांच्या तपश्चर्येत काहीतरी उणीव होती असे म्हणता येईल, अशी टीका केली होती. दुसरीकडे राज्यातही मोदींवर निशाणा साधला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चारही बाजूंनी २७ कॅमेरे लागले आहेत. ध्यान सुरु असताना जो माणूस मग्न असतो तो कॅमेऱ्याकडे पाहत नाही. मात्र पंतप्रधान मोदी चारही बाजूंनी २७ कॅमेरे लावून ध्यानाला बसले आहेत. हा लोकसाधनेचा अपमान आहे. पूर्वीच्या लोकांनी ध्यानधारणा करताना किती सिक्युरिटी वापरली होती? आता तीन हजार सुरक्षा रक्षक हाताशी पकडून हे ध्यान करत आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत जगताप यांनी, “४६ सेकंदात २० अँगल. जगावेगळं ध्यान आहे हे!”, म्हणत खोचक टोला लगावला आहे.
दरम्यान, ध्यानावरून सुरू असलेल्या वादात भाजपने विरोधकांवर जोरदार प्रहार केला. मोदी ध्यानात मग्न आहेत तर विरोधक का चिंतेत आहेत, असा सवाल भाजपने केला आहे. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासंदर्भात सुरक्षा वाढवण्यात आली होती. सुमारे दोन हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. यासोबतच भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाकडूनही कडक नजर ठेवण्यात आली होती.