राजू पोवार : माजी मंत्री इब्राहिम यांच्याशी बैठक
निपाणी : ऊस दरासाठी रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन मोर्चे काढून सरकारला निवेदन दिले आहे. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांनी कारखाने सुरू न करण्याच्या सूचना साखर मंत्री व साखर आयुक्तांनी केली आहे. तरीही अनेक कारखान्यांनी यंदाचा ऊसाचा हंगाम सुरू केला आहे. त्यासाठी बेळगाव येथील अधिवेशनात विरोधी पक्षांसह रयत संघटना आवाज उठविणार असून त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिली. चिकोडी येथील शासकीय विश्राम धामात माजी मंत्री सी. एम. इब्राहिम यांच्याशी बैठक झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
राजू पोवार म्हणाले, साखर मंत्री व साखर आयुक्तांनी ऊस दराबाबत मुख्यमंत्र्यांची भेट करून देण्याचे आश्वासन दिले होते. पण मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत आश्वासन पाळलेले नाही. शिवाय ऊस दराबाबत कोणताही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे विविध शेतकरी संघटना आक्रमक बनल्या आहेत.
गेल्या दहा वर्षापासून साखर कारखाने प्रति टन २९००-३००० रूपया पर्यंत दर देत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षात बियाणे, खते, कीटकनाशके, इंधन, मजुरीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्या मानाने वरील दर शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे कर्जबाजारी होऊन आत्मेकडे वळत आहेत. त्यासाठी साखर कारखान्यांनी प्रतिन साडेतीन हजार तर सरकारने दोन हजार रुपये असे एकूण साडेपाच हजार रुपये दर देण्याची गरज आहे. म्हणून आता सी. एम. इब्राहिम यांनी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवण्यात येणार आहे तसेच रयत व इतर संघटनातर्फे आंदोलन छेडले जाणार आहे.
यावेळी माजी मंत्री इब्राहिम यांनी विधानसभेत आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी धजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, जिल्हाध्यक्ष शंकर मुडलगी, फैजुला माडीवाले, सुनिता होनकांबळे, मायनॉरिटी अध्यक्ष समीर बागवान, सैफ पटेल, सुभान नाईकवाडे, संघटनेचे उमेश भारमल, प्रा. हालप्पा ढवणे, नामदेव साळुंखे, सर्जेराव हेगडे, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, चिनू कुळवमोडे, बबन जामदार, कुमार पाटील यांच्यासह रयत संघटना व धजदचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta