प्र. प्राचार्य डॉ. पी पी शाह : अर्जुनी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर
निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजना (कनिष्ठ) (एन एम. एस) हे राष्ट्रीय एकात्मतेचे सशक्त साधन आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीगत राष्ट्रीय जडणघडणीमध्ये सेवा योजनेचे मोठे योगदान आहे, असे मत अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. पी.पी. शाह यांनी केले. ते अर्जुनी (ता. कागल) येथे देवचंद कॉलेज, अर्जुननगर (कनिष्ठ विभाग) आयोजित ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा सुतार होत्या.
डॉ. पी. पी. शाह म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विचाराच्या राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागून सामाजिक जाणिव अधिक समृद्ध होते. शिबिरातून सुप्त कलागुणांचा विकास होत असतो. याप्रसंगी सरपंच वर्षा सुतार, उपसरपंच सुनिल देसाई , ग्रामपंचायत सदस्य सुदाम देसाई, वृक्षमित्र दसरथ मिसाळ, नामदेव चौगुले, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. यु. घटेकरी यांनी स्वागत केले. प्रा. व्ही. पी. पाटील सूत्रसंचालन तर प्रा. बी. एम. कुंभार यांनी आभार मानले. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य, एनएसएसचे स्वयंसेवक, एनएसएस कमिटी सदस्य, स्वयंसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिर काळात शुक्रवारी (ता.२) माजी मुख्याध्यापक विलास देसाई हे ‘चुकून पडल्या गाठी हसूच आले ओठी, शनिवारी (ता. ३) प्रा. कांचन बिरनाळे -पाटील या ‘महिला आणि प्रसारमाध्यमे’, रविवारी (ता.४) भोगावती महाविद्यालयाचे प्रा. पवन पाटील हे ‘बदलती कुटुंब व्यवस्था व आपली भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी (ता.५) सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर काळात समाज प्रबोधन, अंधश्रद्धा, निर्मूलन, रस्ता बांधणी, रोपलागवड, ग्रामसफाई, घरोघरी शौचालय बांधण्याबाबत प्रबोधन करण्यावर भर दिला जाणार आहे. शिबिराचा समारोप मंगळवारी (ता.६) रोजी सकाळी ११ वा. होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta