राजू पोवार : आंदोलनाची तयारी पूर्ण
निपाणी (वार्ता) : येत्या १९ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटने तर्फेआंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी चिकोडी जिल्ह्यातून १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून त्यामध्ये शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केले. मत्तीवडे येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना जास्त खोटे बोलण्याची गरज नाही. आम्ही ऊसाला प्रति टन साडेपाच हजार रुपये मिळावा, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकाची भरपाई तात्काळ देण्यात यावी, घरे पडलेल्या शेतकऱ्यांना घरकुल मंजूर करावे, यासह विविध मागण्यासाठी आंदोलन करणार आहोत. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना अधिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आम्हाला पुढील निष्कर्षाची खात्री आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे कृषी ऊसाला एफआरपी दराऐवजी एसएपी लागू केली पाहिजे.
याबाबत १९तारखेला सरकारने स्पष्ट निर्णय घ्यावा. राज्यातील सर्व खरेदीदारांसाठी खरेदी केंद्र सुरू करावेत. शेतकऱ्यांच्या पिकांची रास्त भावात खरेदी झाली पाहिजे. स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. नैसर्गिक आपत्तीचा निधी अद्याप लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी चिकोडी जिल्ह्यातून १० हजार शेतकऱ्यांसह सुवर्णसौधला घेराव घालण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी रयत संघटना मत्तिवडे शाखा अध्यक्ष शरद भोसले. उपाध्यक्ष चिनू कुळवमोडे, कार्याध्यक्ष शुभम केसरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी कुळवमोडे, राहुल खाडे, चेतन चव्हाण, नवनाथ पाटील, बंडा पाटील, संग्राम जाधव, विजय कुर्ले, सतीश पाटील, सचिन भोईटे, बजरंग माने, अंकुश बेडगे, संजय काटे, संग्राम केसरकर, अनिल जाधव, कल्लू कमते
यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta