
प्रमोद हर्षवर्धन : कोगनोळी येथे शौर्य दिन उत्साहात संपन्न
कोगनोळी : 1 जानेवारी 1818 रोजी भीमा नदीकाठी भीमा कोरेगाव लढाई झाली. लढाई 500 शूरवीर विरुद्ध 28 हजार पेशवे यांच्यात झाली असून 500 शूरवीरांनी 28 हजार पेशव्यांचा पराभव करून छत्रपती संभाजी महाराजांची मनुस्मृती कायद्याने केलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही लढाई केली आहे, असे प्रतिपादन प्रमोद हर्षवर्धन यांनी केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, देशांमध्ये इंग्रजांची गुलामगिरी असली तरी त्या अगोदर पेशव्यांची गुलामगिरी मागासवर्गीय लोकांच्यावर होती. त्यामुळे दोन दोन गुलामगिरीमध्ये येथील मागासवर्गीय समाज होता. आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे व संभाजी महाराजांचा हत्येचा बदला देखील घेतला पाहिजे म्हणून 500 शूरवीरांनी 28 हजार पेशव्यांच्या विरुद्ध लढाई करून ही लढाई आपल्या अस्तित्वासाठी केली होती,असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक देवानंद आवटे यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, युवा उद्योजक बाळासाहेब हादीकर यांच्या हस्ते केले.
भीमा कोरेगाव प्रतिकृती स्तंभाचे उद्घाटन पंकज पाटील यांच्या हस्ते केले. यावेळी ते बोलताना म्हणाले येणाऱ्या काळात येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यासाठी आपल्याकडून लागल ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
बाळासाहेब हदीकर म्हणाले, भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती उभारुन खरोखरच आपण इतिहासाची आठवण करून देत आहात. 500 शूरवीरांनी 28 हजार पेशव्यांना त्या काळात हरवले होते. त्याचप्रमाणे आत्ताच्या युवकांनी 28 हजार नवीन गोष्टी केल्या पाहिजे, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व डीएड कॉलेज कागलचे प्राचार्य धनशाम मेस्त्री, आरुण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सदस्य प्रवीण भोसले होते.
यावेळी कृष्णात खोत, सुधीर माने, सचिन इंगवले, प्रशांत मधाळे, संजय पाटील, सुधीर माने, प्राध्यापक बाबासाहेब आवटे, शिल्पकार आवटे, अरुण घस्ते, रोहन कानडे, पत्रकार राहुल मेस्त्री यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सुत्रसंचलन पुनम मेस्त्री यांनी तर आभार आदित्य शिंत्रे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील युवा भिमसैनिकांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta