सौंदलगा : सौंदलगा येथील रहिवासी रामदास सूर्यवंशी हे आपली पत्नी सुनीता सूर्यवंशी यांच्यासोबत युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढावयास गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढत असताना. एटीएममधून दहा हजार रुपये बाहेर आलेले सुनिता सूर्यवंशी यांना दिसले. त्यांनी आपले पती रामदास सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हे पैसे आपले नाहीत म्हणून त्यांनी पैसे युनियन बँक शाखा व्यवस्थापक नरेश हलकर्णी यांच्याकडे दिले. त्यावेळी उपशाखा अधिकारी एस. महेश, कॅशियर शीला जाधव, स्कंद गुप्ता, गौतम तलवार, सीमा महाजन आदी शाखेतील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रामदास सूर्यवंशी व सुनिता सूर्यवंशी यांचे आभार शाखा व्यवस्थापक नरेश हलकर्णी यांनी मानले. व पुढे म्हणाले की, सौंदलगा गावातील नागरिकांचा प्रामाणिकपणा यामुळे दिसून येत आहे. त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबीयांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. या प्रमाणिकपणाबद्दल रामदास सूर्यवंशी यांचे गावात कौतुक होताना दिसून येत आहे.