कोगनोळी : हणबरवाडी तालुका निपाणी येथे रविवार तारीख 4 रोजी रात्री 12 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी आडी मल्लया रोडवर दीपक कदम यांच्या घरालगत शेतातून मुख्य रस्त्यावरून बिबट्या जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. हणबरवाडी येथील पेट्रोल पंपावर कामावर असणारे अनिकेत खोत रात्री कामावरून घरी परतत असताना त्यांना या बिबट्याचे दर्शन झाले आहे. यानंतर दीपक कदम यांच्या घरातील सीसीटीव्ही पाहणी केल्यानंतर बिबट्या आल्याचे पक्के झाले.
सध्या ऊसतोड हंगाम सुरू असून रात्री अपरात्री ऊसतोड मजूर, शेतीला पाणी देण्यासाठी जाणारे शेतमजूर यासह अन्य कामासाठी येजा करणाऱ्या नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांनी ताबडतोब निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनसी संपर्क साधला असता घटनास्थळी एएसआय एस ए टोलगी, पी डी गस्ती यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हणबरवाडी येथील नागरिक दीपक कदम, शशिकांत खोत यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा बिबट्या दिसला नाही.
हणबरवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहान पोलीस व ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta