
अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामी :सिद्धगिरी मठ येथे होणार भाविकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : कणेरी येथील सिद्धगिरी मठाला १३५० वर्षाहून अधिक परंपरा लाभली आहे. येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलम पंच महाभूत लोकोत्सव २० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आल्याची माहिती सिद्धगिरी मठाचे ४९ वे अधिपती काडसिद्धेश्वर स्वामींनी दिली.
स्वामी म्हणाले, मठाने आध्यात्मा सोबातच कृषी, पारंपरिक शिक्षण, आरोग्य, महिलासबलीकरण, संस्कृतीरक्षण, गो-स्वर्धन, संशोधन आणि आपत्ती व्यस्थापन अशा अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. याच शृंखलेत ‘पर्यवरणरक्षणासाठी’ जगाला दीपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक होईल असा सुमंगलम पंचमहाभूतलोकोत्सव आयोजित केला आहे. पर्यावरणीय हानीच्या अनेक घटना आपण पाहत आहोत. त्सुनामी, अति वृष्टि, भूकंप, महापूर या सारख्या अनेक समस्याना आज जगाला तोंड द्यावे लागत आहे. आपण निसर्गाचा सर्वार्थाने विचार नाही केला तर येणाऱ्या काळात जगाला गंभीर पर्यावरणीय समस्याना सामोरे जावे लागू शकते. यासाठी आपण जागृती करणे गरजेचे आहे. कोल्हापुरातील सिद्धगिरी मठ येथे सुमंगलम् हा पर्यावरणीय लोकोत्सव होत आहे ही गौरवाची बाब आहे.
सुमारे ६५० एकर इतक्या विशाल परिसरात उत्सवाची तयारी सुरू असून ही तयारी आता अंतिम टप्यात आली आहे. या उत्सवाला ३० ते ४० लाख लोक सहभागी होणार आहेत.
लोकोत्सवात प्रामुख्याने पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या तत्वाचे मूळ स्वरूप, त्यात मानवाने केलेले अतिक्रमण व भविष्यात आपण पुनः ही तत्व मूळ स्वरूपात आणण्यासाठी करावयाची उपाययोजना यासाठी जागृतीचा जागर सात दिवस केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक तत्वाच्या प्रदर्शनी (गॅलरी) उभारण्यात आलेल्या आहेत. भारतीय परंपरा आणि जीवन शैली यांचे जतन करत येणाऱ्यां पिढीला आपण सात्विक जीवन प्रदान करणे यासाठी विविध माध्यमांच्याद्वारे प्रदर्शनी (गॅलरी) सिद्धगिरी मठावर साकार होत आहेत.
भारताच्या परांपरीक ज्ञानाची व त्यासंबंधी विविध संशोधन कार्याची ओळख सहभागी लोकांना होणार आहे. समाजाभिमुख कार्य करणारा मठ म्हणून सिद्धगिरी मठाकडे पाहिले जाते. हा जागृतीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी सिद्धगिरी मठच्या सोबत सर्वांनी सहभागी व्हावे.या उत्सवात पारंपरिक सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचे रोल मॉडेल प्रत्यक्षात पाहता येणार आहे. देशी बियाणे, जैवीक खत, जैविक किड नियंत्रक प्रक्रिया समजून ‘घेता येणार आहेत. त्यामुळे रासायनिक विषमुक्त अन्न-धान्याकडे टाकलेले ते एक समग्र पाऊल ठरेल. देशात पहिल्यांदाच देशी प्रजातीच्या गाई, म्हैशी, बकऱ्या, घोडे, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन हि भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्या प्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होईल. याउत्सवात देश भरातील परंपारीक वैद्य सहभागी होणार असून लुप्त होणारी भारतीय चिकित्सा पद्धत टिकवण्यासाठी वैद्यांचे संमलेन होणार आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीचा लाभ ही उत्सवासाठी येणाऱ्या लोकांना घेता येईल . या उत्सवात जगभरातील ५० देशातून नामवंत संशोधक, अभ्यासक आवर्जून या उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह ५०० विद्यापीठांचे कुलगुरू, देशभरातीलहजारो संत-महंत, विविध समाज सेवी संस्था सहभागी होणार आहेत. लाखो लोकांना जेवण, पाणी, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत विस्तृत परिसरात त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
—-
६५० एकरात कार्यक्रम
६५० एकर परिसरात होणाऱ्या सुमंगलम कार्यक्रम स्थळी प्रामुख्याने पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या तत्वांच्या गॅलरी, मुख्य सभा मंडप सोबतच सोळा संस्कार, आरोग्य अशा गॅलरी आहेत.
—-
लोकोत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या मिरवणुकीत कोल्हापूर शहरात प्रथमच अनेक राज्यातील विविध कलाविष्कार पाहायला मिळणार आहेत तसेच या उत्सवात अनेक चित्ररथ हि सहभागी होणार असून हि शोभायात्रेचा समारोप पंचगंगा घाट येथे होणार असून यावेळी पंचगंगा नदी आरती होणार आहे. यासाठी मा. गृहमंत्री मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.
—————-
प्लास्टिक कचरा घेऊन येण्याचे आवाहन
उत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांना काडसिदेश्वर स्वामीजींनी सोबत एक किलो प्लास्टिक कचरा सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. येथे गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून रिसायकलिंग युनिट द्वारे त्या कचऱ्याचे पुनर्निमिती प्रक्रिया लोकांना पाहता येणार आहे. यामुळे समाजातील युवकांना एक नवीन दिशा निश्चितच. मिळू शकते वयामाध्यमातून प्लास्टिक कचऱ्याच्या भीषण समस्यांना एक पर्याय मिळू शकत असल्याचे स्वामींनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta