

लवकरच ‘गाभ’ चित्रपट प्रदर्शित ; समाजातील तरुण आणि जनावराची कथा
निपाणी (वार्ता) : ‘गाभ’ हा शब्द उत्सुकता वाढविणारा असला तरी तो ग्रामीण भागात परवलीचा आहे. गाभ किंवा गाभण हे शब्द कृषक जीवनाची प्रचिती देतात. विशेषत: पशुपालकांचे जगणे त्याभोवती फेर धरणारे असते. बदलत्या अर्थ आणि कृषक कारणांमुळे वावर कसणाऱ्याला लग्नासाठी मुलगी मिळणे अवघड झाले असताना म्हैशीलाही रेडा मिळत नाही. पशुपालकांचे पोट भरत नाही. तिथे तो रेड्याला कसै पोसणार? त्याचीच गोष्ट अनुप जत्राटकर ‘गाभ’ या सिनेमातून घेऊन येत आहे.
‘गाभ’ ही कथा आहे एका मानसिकतेची. ती आहे तुमच्या माझ्यासारख्या गुणदोषांसह जगणाऱ्या तरुणांची… मैत्रीची…जनावरांची… आणि माणसातल्या पशूची!
‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक पाहिले असेल तर त्यातला शाहीर (कैलाश वाघमारे) कसा विसरता येईल. तोच कैलास गाभचा नायक आहे आणि सायली बांदकर नायिका आहे.
ग्रामीण बाज, ग्रामीण ढंग वापरून या चित्रपटातून एका सामाजिक विषयाला हात घातला आहे. शहर आणि ग्रामीण भागात सध्या विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. तर ग्रामीण भागात म्हैस गाभण जाण्यासाठी रेडा शोधावा लागत आहे. या दोन्ही बाजू अगदी परखडपणे अनुप जत्राटकर यांनी चित्रपटात मांडले आहेत. या चित्रपटातून समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न आहे. गडहिंग्लज परिसरातील सरोळी गावात या चित्रपटाचे चित्रीकरण अत्यंत सक्षमपणे निर्मिती पूर्ण केली आहे.
‘गाभ’चे नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे. सावनी, रवींद्र, प्रसेनजीत कोसंबी आणि आनंद शिंदे यांनी गाणी गायली आहेत. त्यामुळे संगीताची एक वेगळी मेजवाणी या सिनेमातून अपेक्षित आहे. या चित्रपटात मुंबईपासून ग्रामीण भागापर्यंतच्या कैलास वाघमारे, सायली बांदकर, उमेश बोळके, विकास पाटील, वसुंधरा पोखरणकर, प्रकाश काशीद-कारदगा, चंद्रशेखर जनवाडे -बेनाडी यांच्यासह सर्वच कलाकारांनी मन ओतून आपल्या कला सादर केल्या आहेत.
अनुपचा हा पहिलाच मोठा सिनेमा आहे. त्याची आठवण गेल्या आठवड्यात माटुंग्यातील सिटीलाईट सिनेमागृहात ‘गाभ’च्या पोस्टर लॉचिंग समारंभाच्या वेळी झाली. यानिमित्त गाभच्या संपूर्ण टीमसह ‘सकाळ’मधील जुने सहकारी व मित्र चित्रपट समीक्षक मंदार जोशी, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. प्रसाद ठाकूर, निर्माते मंगेश गोरे त्यांची भेट झाली.’गाभ’मध्ये म्हैशीसाठी रेडा सापडत नाही; पण ‘गाभ’च्या पोस्टर लाँचिंगला उपस्थितांना मात्र भरभरून दाद दिली. संयोजकांची ही कल्पना भन्नाट होती. हा चित्रपट दोन तास तेरा मिनिटांचा आहे.
————————————————————–
सेन्सॉरकडून ‘गाभ’ला दाद
चित्रपट तयार झाल्यानंतर सेन्सॉरकडे निरीक्षणासाठी पाठविण्यात आला होता. चित्रपट पाहून पूर्ण झाल्यानंतर सेन्सॉरच्या पथकाने उभे राहून या चित्रपटाला चांगली जात दिली. प्रेक्षक हा चित्रपट डोक्यावर उचलून घेतील असा विश्वास कलाकार, लेखक, आणि दिग्दर्शकांना वाटत आहे.
—————————————————————–

‘आतापर्यंत १५० पेक्षा अधिक माहितीपट तयार करण्यासह त्याचे लेखन केले आहे. अनेक माहिती पटाना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. आता प्रथमच मोठ्या बजेटच्या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यामुळे चित्रपटाला किती यश मिळेल हे पाहावे लागेल.’
– अनुप जत्राटकर, लेखक, दिग्दर्शक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta