काकासाहेब पाटील : सिद्धरामय्या यांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ बुधवारी (ता.१५) निपाणी येथे प्रजाध्वनी यात्रेचे आयोजन केले आहे. सायंकाळी सहा वाजता येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले. येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
काकासाहेब पाटील म्हणाले, या कार्यक्रमास काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, माजी मंत्री जमीर अहमद, प्रचार समिती प्रमुख एम. बी. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता आणि डोंगरा जवळील हेलीपॅड येथे सिद्धरामय्या यांचे आगमन होणार आहे. तेथून प्रजाध्वनी बसमधून ते निपाणीत येणार आहेत. माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील धर्मवीर संभाजी चौकापासून कार्यक्रम स्थळापर्यंत एक हजार युवकांची मोटर सायकल रॅली निघणार आहे. कार्यक्रमस्थळी पोवाडा, भारुडसह शहर आणि ग्रामीण भागातील वक्त्यांचे मनोगत होणार आहे. यावेळी सुमारे पंधरा हजार नागरिक येणार आहेत. काँग्रेसचे ध्येयधोरणे समजावून सांगण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले असून यावेळी मतदारसंघातील काँग्रेस प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे.
माजी मंत्री विरकुमार पाटील यांनी, येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात सिद्धरामय्या यांचे स्वागत होणार आहे. तिथून मिरवणुकीद्वारे हायस्कूलच्या ठिकाणी मुख्यमंत्री येणार असल्याचे सांगितले.
चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी, आतापर्यंत सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली प्रजाध्वनी यात्रा ११० मतदारसंघात घेण्यात आली आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हैसूर व इतर ठिकाणी ही यात्रा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात निपाणी मतदारसंघातून सुरुवात होणार आहे. त्यानंतर अथणी, कागवाड, रायबाग, कुडची, हुपरी यमकनमर्डीसह चिकोडी, जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात १७ मार्चपर्यंत होणार आहेत. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणीतील यात्रेचे आयोजन केले आहे. यासंदर्भात दररोज काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून तयारी सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा उद्योजक रोहन साळवे, बसगौडा पाटील, अण्णासाहेब हावले, अन्वर हुक्केरी, लक्ष्मण हिंदलकर, व्हनगौडा पाटील, माजी सभापती सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, अशोक पाटील -कोडणीकर, सिताराम पाटील यांच्यासह मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
————————————————————
काँग्रेसचे तिकीट ‘काकांना’च
काँग्रेस पक्षाचे तिकीट हे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनाच मिळणार आहे. सिद्धरामय्या येण्यापूर्वीच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. किंवा सभेमध्येच उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा असल्याचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta