आठवडाभराची कमाई कंपनीला : अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
निपाणी : खासगी फायनान्स कंपन्यांकडून ग्रामीण भागातील महिला बचतगटांसह नागरिकांना कर्ज वाटप केले जाते. या कंपन्या बँकांकडून व्यावसायिक दराने कर्ज घेऊन बँक खाते नसलेल्यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे बचतगट तयार करून महिलांना मायक्रो फायनान्सचे कर्ज देते.
त्यांच्या व्याजाचा दर, प्रोसेसिंग फी व दंड व्याजाची आकारणी यातच या निपाणी तालुक्यातील महिलांची आर्थिक कोंडी होत असून कर्जामुळे त्यांचे सुखी संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. लोकप्रतिनिधी व शासनाने याबाबत दखल घेणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागातील कुटुंबाचा आधारस्तंभ ही महिला आहे. ती रोजमजुरीला जाऊन कुटुंबाचा गाडा हाकते. संसारात आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी ती कर्जबाजारी होते.
कुटुंबातील आजारपण, शेती, मुलांचे शिक्षण, लग्नकार्य यासाठी ती कर्ज काढते. त्यासाठी महिला बचतगट हा सोपा मार्ग ठरतो. मात्र महिलांचा उद्धारक ठरणारे हेच बचतगट आता महिलांच्या गळ्यातील फास ठरत आहेत. बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे हाशासनाचा उद्देश होता. मात्र यात आता मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सावकाराप्रमाणे प्रवेश करून ग्रामीण महिलांना आपले लक्ष्य केले आहे. बचतगट तयार करून बचतगटांना कर्ज देणे व मग दामदुपटीने दंड, व्याजासह कर्जवसुली करणे यामुळे या महिला कर्ज भरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे संसारच उद्ध्वस्त होणार्या मार्गांवर आले आहेत. हा एकप्रकारचा खासगी फायनान्स कंपन्यांचा ट्रॅप आहे. ही बाब लोकप्रतिनिधी व सरकारने समजून घेत या कंपन्यांच्या कर्जाचे विश्लेषण करून योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक महिलांचे संसार कोलमडून अशी भीती व्यक्त केली जात आहे.
