ऊसतोड मजुरांच्या समस्या कायम : मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
निपाणी : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगारांचा दिवस हा पहाटेच्या चार वाजेपासून सुरू होतो. सकाळचा स्वयंपाक आवरून पहाटे चारच्या सुमारास खोपीवरून ऊसाच्या फडात जाणारे कुटुंब हे दुपारी दोन ते चारच्या दरम्यान पर येतात. ऊस बागायतदारांचा ऊसाचा कारखान्यात वेळेत पोहचला पाहिजे, या काळजीने जोखीम पत्करून दिवस- रात्र न पाहता ऊसाच्या स्थळातून ट्रक भरून बाहेर काढतात. ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबाची कामात मदत व्हावी, म्हणून मुलांना आपल्याबरोबर फडात घेऊन जातात. तेथे ना पुरेसा आडोसा, ना पुरेशी आरामाची जागा. ही सगळी लहान मुले तेथेच उसाच्या पाचटावर बसून काम करत किंवा खेळत दिवस घालवतात.
ऊस तोडणी कामगार सहा महिने आपल्या गावातून बाहेर असल्याने त्यांना अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतो. सरकार ऊसतोडणी कुटुंबासाठी मजुरांसाठी, त्यांच्या आरोग्य योजना आर्थिक साहाय्य आणि घरे देण्यासाठीची योजना तयार करत आहे. याची फक्त चर्चा होताना दिसते. प्रत्यक्षात मात्र काही होताना दिसत नाही. त्यामुळे ऊसतोड कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वर्षीच्या हंगामात निपाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड वाढल्याने कर्नाटक महाराष्ट्रातील विविध सहकारी साखर कारखान्यांचे कामगार कामाला आले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांची चिंता कमी झाली आहे. ऊसतोड कामगार हा घटक वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यांच्यावर अन्याय होत आला आहे. साखर कारखान्यांकडून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. साखर कारखान्यांची धुराडी ऊसतोड कामगारांमुळे पेटतात. साखर कारखाने या कामगारांच्या जिवावर गब्बर झाले. त्यांनी या कामगारांना काय दिले?, उलट त्यांच्या पिढ्यानपिढ्या आगी सारख्या जळत गेल्या, हे वास्तव भयाण आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना राजकारण्यांनी कायम तेवत ठेवलं. हंगामात चर्चा करायची, मोठी मोठी आश्वासनं द्यायची अन् परत जैसे थे यामुळे ऊसतोड कामगार हैराण झाला आहे.
—
* ऊसाच्या फडात काम करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
* कधी कोणते संकट ओढावेल हे सांगता येत नाही.
* एखाद्या वेळेस कोयत्याने कापून घेणे, भाजणे, ऊसाच्या पात्याने कापून घेणे, सतत कुठल्या न कुठल्या कारणाने होणार्या जखमा, हे या मुलांसाठी आणि पालकांसाठी न टाळता येणारे वास्तव आहे.
* ऊसतोड मजुरांच्या मुलाच्या हातात पाटी, लेखन न देता उसाची मोळी बांधणे, त्याची वाहतूक करणे, ऊस तोडणे अशी कौशल्ये ही मुले घेत आहे.
Check Also
केंद्राने सीमाप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करणारा ठराव संमत
Spread the love मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल निपाणीत आनंदोत्सव निपाणी : मराठी भाषेला …