Share
निपाणी (वार्ता) : डॉ. मोनिका ठक्कर यांच्या ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात ‘माझी बोली माझी कथा’ या ५७ बोलीतील कथासंग्रहात निपाणीतील कन्या सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील ‘झटाझोंबी’ कथेचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निपाणीतील साहित्य क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रत्येक प्रांतात ‘बोली’ भाषेविषयी अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच ते ग्रंथ स्वरुपात असल्यास ते पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात बोलीभाषा नामशेष होत चालल्या आहेत. याबाबतचा विचार करून बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने, वाचकांना ते रंजक वाटावे. यासाठी कथासंग्रह निर्माण केला आहे. कथासार, कठीण शब्दांचे अर्थ, त्या-त्या बोली विषयी अभ्यासपूर्ण माहिती तसेच लेखकांचा थोडक्यात परिचय अशा धाटणीचा हे पुस्तक आहे. या पुस्तकात ५७ बोलीतील ५७ कथा आहेत. या पुस्तकात निपाणीतील कन्या आणि पुणे येथील रहिवासी सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील ‘झटाझोंब्या’ कथेचाही समावेश झाला आहे.
सुचिता घोरपडे यांच्या ‘खुरपं’ या कथासंग्रहाला यापूर्वी मध्य प्रदेशातील पुरस्कार जाहीर झाला होता. रोख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कोल्हापूर, निपाणी भागातील वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण बोलीत ग्रामीण जीवन घेऊन येणाऱ्या कथा लिहिणाऱ्या लेखिका घोरपडे यांचा ‘खुरपं’ हा पहिलाच कथासंग्रह होता.
कृषीविश्वाशी निगडित ग्रामीण जनजीवनाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटना, अवकाश, पात्र प्रसंग या सर्वांना सामावून घेणाऱ्या कथा या संग्रहात आहेत.
बोलीविषयक असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच या ग्रंथाच्या रूपाने झाला आहे. माझी बोली, माझी कथा’ असे या ग्रंथाचे नाव असून, या ग्रंथाचे प्रकाशन लोकायन प्रकाशन संस्था यांनी केले आहे. डॉ. मोनिका ठक्कर यांनी आजवर संशोधनात्मक लेखन आणि संपादन केलेल्या १२ ग्रंथांचा अनुभव पाठीशी घेऊन महाराष्ट्रातील विविध बोलीतील सदर अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संकलन झाले आहे.
Post Views:
909
Belgaum Varta Belgaum Varta