महिनाभराच्या उपवासाची सांगता : हिंदू मुस्लिम बांधवांनाकडून शुभेच्छा
निपाणी : कोरोना संसर्गामुळे बकरी ईद आणि रमजान ईद निमित्त सार्वजनिक ठिकाण नमाज पठण करण्यास प्रशासनाने निर्बंध घातले होते. पण संसर्ग कमी झाल्याने शहर व परिसरातील समस्त मुस्लिम बांधवांनी शनिवारी (ता.२२) रमजान ईद सण भक्तिभावाने साजरा केला. तसेच येथील बेळगाव नाक्यावरील इदगाह मैदानावर सार्वजनिकरित्या नमाज पठण करण्यात आले. त्यामुळे दिवसभर मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह दिसत होता. यावेळी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसेच दुपारी व सायंकाळी हिंदू बांधवांना शीरखुर्मासह जेवणाचे आमंत्रण दिले होते.
कोरोना संसर्ग असल्यामुळे सरकारच्या आदेशानुसार रमजान ईद घरगुती पद्धतीने साजरा केला जात होता. त्याचप्रमाणे सामुहिक नमाज पठणावर देखील बंदी होती. मात्र कोरोनाच्या सर्व नियम मागे घेण्यात आले असल्यामुळे शहरातील मुस्लिम बांधवाकडून रमजान सण उत्साहात साजरा केला. सकाळी साडेआठ वाजता नरवीर तानाजी चौकात मुस्लीम बांधव एकत्र येऊन बेळगाव नाका मार्गे ईदगाह मैदानावर पोचून तेथे नमाज पठण केले.
देशात सुख शांती आणि सलोख्याने वातावरण रहावे, यासाठी अल्लाकडे सर्वांनी भक्तिभावाने प्रार्थना केली आहे. गेल्या दोन वर्षापासून हिंदू मुस्लिम कोणतेही सण सार्वजनिकरित्या साजरे झाले नव्हते. मात्र संसर्ग कमी झाला असला तरी यापुढे प्रत्येकांनी सर्वप्रथम आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी एकमेकाशी बंधुभावाने राहून सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले. याशिवाय काही मुस्लीम बांधवांनी दरगाह व मज्जिद ठिकाणी जाऊन नमाज पठण केले. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनातर्फे इदगा मैदानाची स्वच्छता करण्यात आल्याने मुस्लिम बांधवातून समाधान व्यक्त करण्यात आले. नमाज साठी आलेल्या मुस्लिम बांधवांच्या वाहनासाठी पार्किंग, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मंडल पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद पुजारी व सहकाऱ्यांनी परिसरात बंदोबस्त ठेवला होता.
Belgaum Varta Belgaum Varta