आमदार अमोल मिटकरी : उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा
निपाणी (वार्ता) : राज्यातील भाजप सरकार महागाई वाढवण्यासह दहशत माजवत आहे. भागातील मंत्री व खासदार हे संकटकाळी सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे न राहता, ते त्यावेळी दिल्लीत मंत्री पदासाठी आपली सेटिंग लावत होते. त्यावेळी कोणतेही पद सत्ता हाती नसताना या भागातील उत्तम पाटील यांनी संकटकाळी शासनाच्या यंत्रणा येण्या अगोदर ते त्या ठिकाणी पोचले होते. अशा सर्वसामान्यांविषयी कळकळ असणाऱ्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. अक्कोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
आमदार मिटकरी म्हणाले, २२ हजार कोटी विकास कामांचा गावा करणारे मंत्री व खासदारांना निपाणी डोंगर भागातील गावांना पाणी समस्या का दिसत नाही?, गेल्या काही वर्षापासून उत्तम पाटील यांनी काँग्रेसमध्ये राहून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आपला संवाद ठेवला. त्यांच्या समस्या मिटविण्यासाठी काम केले. असे असताना काँग्रेस पक्षाने पाटील यांना डावलण्याचे काम केले. पण सर्वसामान्यांचा कार्यकर्ता हा निपाणी मतदारसंघाचा आमदार होणारच, यात शंका नाही.
उमेदवार उत्तम पाटील म्हणाले, १० वर्षांपासून मंत्री असताना केवळ कमिशनचे राजकारण केले. सर्वसामान्य नागरिकाला शासकीय कामांसाठी मंत्र्याची शिफारस घ्यावी लागते. हे थांबले पाहिजे. सर्वच शासकीय विभागातील अधिकाऱ्यांकडून लाखो रुपयांची लाच स्विकारुन त्या आपला कोटा पूर्ण करत आहेत. निपाणी भागाचा औद्योगिक विकास का झाला नाही, विद्यमान मंत्री व खासदारांनी तो का केला नाही, असा सवाल व्यक्त करत या निवडणुकीत आपणाला मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार राजू आवळे, स्नेहल स्वामी, संतोष मोहिते निशिकांत कुरळुपे, अमित शिंदे, निवास खोत, सुरज किल्लेदार रघुनाथ सोळांकुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
सभेस माजी आमदार प्रा. सभा जोशी, अशोककुमार असोदे, भैय्या माने, राजू पाटील, चेतन स्वामी, निरंजन पाटील- सरकार, गजानन कावडकर, संजय स्वामी, अभय मगदूम, संभाजी थोरवत, रमेश भिवसे, राजगोंडा पाटील, रोहन भिवसे, अनिल हांडे बाबासाहेब नाईक प्रवीण पाटील, अमोल विटे, धनश्री पाटील, विनयश्री पाटील, अनिता पाटील, अनिता कुंभार संगीता वंटे, पोपट मगदूम, अशोक जाधव यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta