राजू पोवार : यरनाळ, अंमलझरी गव्हाणमध्ये निजदची सभा
निपाणी (वार्ता) : दरवेळी विधानसभा, लोकसभा व इतर निवडणुका होतात. त्यामध्ये केवळ पैशाचे राजकारणात केले जाते. अशा निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असून आता पैशाचे राजकारण करणाऱ्यांना बाजूला करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या वेळी चिरीमिरी देऊन निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून विकास कामाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. सध्या मात्र धनाढ्य व्यक्तीच निवडणुका लढवित आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांनी निवडणूक हातात घेतले असून सर्वसामान्यांची कामे करणाऱ्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला निवडून देण्याचे आवाहन उमेदवार राजू पोवार यांनी केले. यरनाळ, अंमलझरी, गव्हाण कुन्नूर, शेंडूर, गोंदुकुप्पी, तवंदी येथे आयोजित धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमध्ये ते बोलत होते.
डोंगर भागातील शेतकरी व नागरिकांचा धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सर्वांना चांगला प्रतिसाद मिळत असून इतर तीन राष्ट्रीय पक्षाबरोबर निधर्मी जनता दल टक्कर देत आहे.
राजू पोवार म्हणाले, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना अनेक शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. याशिवाय सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचा अजूनही उपयोग होत आहे. निपाणी मतदारसंघाला चळवळीचा वारसा असून या पुढील काळातील पैशाचे राजकारण मोडीत काढून चळवळीच्या माध्यमातून समाजाची सुधारणा करून विकास होणे आवश्यक आहे. आतापर्यंत रयत संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने केली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लागल्या या पुढील काळात सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी विधानसभेत पाठवण्याचे आवाहन राजू पोवार यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta