काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक : लवकरच वरिष्ठ नेत्यांना भेटणार
निपाणी : विधानसभा निवडणुकीतील काकासाहेब पाटील यांच्या पराजयाला आपणच जबाबदार असल्याचे सांगितले आहे. त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली असून गेल्या ४० वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या काकासाहेब पाटील यांना महामंडळावर स्थान द्यावे, अशी मागणी निपाणी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. सोमवारी (ता.१५) येथील शासकीय विश्रामधामात आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली.
काकासाहेब पाटील हे निवडणुकीसाठी इच्छुक नसतानाही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणूक लढवली. शिवाय ही निवडणूक कार्यकर्त्यांनीच हातात घेतली होती. त्यामुळे त्यांचा पराजय झालेला नाही. त्यांना मिळालेली मते ही निर्णायक आहेत. अनेकांना काकासाहेब पाटील यांनी मोठे केले असून त्यांनीच या निवडणुकीत धोका दिला आहे. अशा व्यक्तींना मतदार चांगलाच धडा शिकवणार आहेत. निपाणी मतदारसंघात काँग्रेस पक्ष टिकवून ठेवण्यासाठी काकासाहेब पाटील यांना पद देणे आवश्यक आहे. धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा पराभव झाला आहे. हा कौल कार्यकर्त्यांनी स्वीकारला असून या पुढील काळात मतदारसंघात काँग्रेस वाढीसाठी सर्वांचेच प्रयत्न होणार आहेत. मतांचे विभाजन झाल्यामुळेच काँग्रेस पक्षाला पराभव शी करावा लागला. पक्षाची पडझड थांबवून तो भक्कम करण्यासाठी सरकारने काकासाहेब पाटील यांची महामंडळावर वर्णी लावण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, निकु पाटील, माजी नगराध्यक्ष गजेंद्र पोळ, नवनाथ चव्हाण, जरारखान पठाण, रियाज बागवान, सचिन लोकरे, विनोद साळुंखे, अशोक लाखे, अस्लम शिकलगार, बाळासाहेब कमते, किरण कोकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
बैठकीस माजी नगराध्यक्ष, विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, मुन्ना काझी, विश्वास पाटील, युवराज पोळ, सुभाष कांबळे, मुकुंद रावण, ॲड. संजय चव्हाण, अल्लाबक्ष बागवान, प्रशांत नाईक, रामा निकम, संदीप चावरेकर, सागर पाटील, विनोद बल्लारी, इम्रान मुल्ला, कमरुद्दिन मुल्ला, धनाजी निर्मळे, सुनील हिरूगडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta